विरार : मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा १ ( २०२४/२०२५) या अभियानांतर्गत राज्यात शासनामार्फत घेण्यात आलेल्या ‘माझी शाळा,सुंदर शाळा’ या उपक्रमात विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट उत्कर्ष विद्यालय प्राथमिक विभाग मराठी माध्यम या शाळेने शालेय गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची उत्कृष्ट शैक्षणिक प्रगती यात शासनाचे सर्व निकष पूर्ण करत वसई तालुक्यातील प्रथम क्रमांक पटकावला.
यासाठी संस्था, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी आणि पालक वर्गांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तीन लाख रुपयांचा धनादेश आणि प्रशस्तीपत्र देऊन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.भक्ती वर्तक तसेच सहकारी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.या अभियानाचा बक्षीस वितरण समारंभ दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी सेंट अँथनी हायस्कूल, मालोंडे, वसई (पश्चिम) या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी वसई तालुक्यातील प्रथम तीन क्रमांक आलेल्या शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बक्षीस वितरण समारंभासाठ,मान.श्री. अशोक पाटील (सभापती, पंचायत समिती,वसई) गटशिक्षणाधिकारी मा.माधुरीपाटोळे,जिल्हा परिषद सदस्य मा.कृष्णा माळी मा.सर्व वसई पंचायत समिती सदस्य शिक्षण विभाग, सर्व केंद्रप्रमुख , सर्व मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
तालुकास्तरीय उपक्रमात प्रथम क्रमांक पटकाविल्यामुळे विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री. हितेंद्र ठाकूर, ट्रस्टच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, संस्थेचे खजिनदार शिखर हितेंद्र ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन.पाध्ये, विद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी यांनी सर्व शिक्षकवृंद यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.