प्रसिध्द गायिका चंद्रकला दासरी या गेल्या चार दशकांपासून गायनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या गोड आवाजातून रसिकांना मंत्रमुग्ध करत आहेत. त्यांनी गायलेल्या “थांब थांब कासारा” या आगरी – कोळी गीताची सध्या सोशल मिडीयावर प्रचंड चर्चा आहे. दासरी यांनी “थांब थांब कासारा… माझ्या बाया का रुसल्यान र्र..” हे गीत तीन दशकापूर्वी गायिले होते.
टिप्स कंपनीने बनवले हे गीत पुन्हा नव्याने संगीतकार अनील वैती यांनी बनवले आहे. हे गीत रसिकांना भावू लागले आहे. सदरील गीत ट्रेन्डींगमध्ये आले असून ह्या गीताच्या लाखो रील्स बनल्या असून ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
त्या म्हणाल्या की माझे वडील भजनसम्राट वासुदेव सुतार यांच्याकडून मी गायकी शिकले. लहानपनापासूनच मी वडिलांसोबत भजनांच्या कार्यक्रमांना जात होते. त्यांच्याकडूनच मला गायनाचे बाळकडू मिळाले.
वडिलांच्या काळात माझी गायनाची कला बहरली आणि माझे पती सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक बजरंग बादशाहा यांच्या काळात ती गायनाची कला फुलू लागली. उत्तरा केळकर, वैशाली सामंत, सुलोचना चव्हाण, श्रीकांत नारायण अशा दिग्गज पार्श्वगायकांसोबत मी पार्श्वगायन केले आहे. आगरी – कोळ्यांची लता मंगेशकर असे लोक मला बोलतात. त्याच समाधान आहे. कारण गानकोकिळा लता मंगेशकर माझ्या आदर्श आहेत.
सध्या सोशल मिडिया आणि रील्सच्या जमान्यात “थांब थांब कासारा” हे मी गायलेले गीत नव्या पिढीच्या तरुणाईला आवडू लागले असून त्यांनी या गीताला पसंती दाखवली याचे मला समाधान आहे. याच सर्व श्रेय माझ्या चाहत्यांना तसेच माझ्या कुटुंबाला जाते. शिरवणे, नवी मुंबई हे माझं माहेर घर पण लग्नानंतर मी कल्याणला आले कल्याण म्हणजे संगीताचे माहेरघर असं म्हटलं जातं कारण तिथे महाराष्ट्राचे लाडके गायक प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे हे माझ्या पतीला मानसपुत्र मानत होते.
तसेच गीतकार मानवेल गायकवाड यांच्या सोबत भरपूर गाणी गायली आणि त्यांचा आशीर्वाद भेटला. शिंदे परिवाराने मला मुलीचे स्थान दिलेला आहे. सध्या माझे बॉस्को मार्टीस व शब्बीर अहमद यांच्या सोबत माझे नवीन गीत येत आहे.