सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये पुण्यातील पहिली लेझर-असिस्टेड, स्टेन्टविरहित अँजिओप्लास्टी यशस्वीरित्या पार पडली

Admin

Stent-Less Angioplasty लेझर-असिस्टेड

महाराष्ट्रातील मुंबईबाहेरील पहिली मेटल स्टेन्ट विरहित अँजिओप्लास्टी

हार्ट अटॅक आलेल्या एका ७० वर्षीय मधुमेहग्रस्त रुग्णावर पुण्यातील डेक्कन जिमखाना इथल्या सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पुण्यातील पहिली लेझर-असिस्टेड, स्टेन्टविरहित अँजिओप्लास्टी पार पडली. सह्याद्रि हॉस्पिटल्स, डेक्कन जिमखानाच्या कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ. अभिजीत पळशीकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या क्रांतिकारी प्रक्रियेमुळे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीच्या क्षेत्रामध्ये एक लक्षणीय टप्पा गाठला गेला आहे.

मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रुग्णाला या प्रक्रियेच्या तीन दिवस अगोदर हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता व त्याच्यावर औषधांच्या मदतीने सुरुवातीला उपचार सुरू होते. मात्र, या प्रकरणामध्ये डॉक्टरांना दोन प्रमुख आव्हाने समोर आली. पहिले म्हणजे आर्टरीमध्ये कॅल्शियमचा जाड थर जमा झाल्याने स्टेन्ट टाकण्याची प्रचलित प्रक्रिया पार पाडणे कठीण होते, आणि दुसरे आव्हान म्हणजे स्वत: रुग्ण स्टेन्ट टाकून घेण्यास फारसे राजी नव्हते. हे प्रश्न सोडविण्यासाठी वैद्यकीय टीमने लेझरच्या सहाय्याने करण्यात येण्यारी अँजिओप्लास्टी करण्याचा व त्याला औषध-वेष्टित फुग्याची (ड्रग-कोटेड बलून) जोड देण्याचा पर्याय निवडला, ज्यामुळे कायमस्वरूपी धातूचे स्टेन्ट बसविण्याची गरज न भासता आर्टरी मोकळी करण्यात यश आले.

या अँजिओप्लास्टी प्रक्रियेमध्ये एक्सिमर लेझर (Excimer laser) हे आर्टरीजच्या आत जमलेल्या कॅल्शियम आणि कोलेस्ट्रोलचे थर प्रभावीपणे दूर करणारे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात आले. यानंतर ड्रग-कोटेड बलूनचा वापर करण्यात आला, जो पारंपरिक स्टेन्स्ट्साठीचा एक अभिनव पर्याय आहे. कायमस्वरूपी इम्प्लान्ट बसविण्याऐवजी असा ड्रग-कोटेड बलून औषधाला आर्टरीपर्यंत पोहोचवतो आणि त्यानंतर तो काढून घेतला जातो व तिथे कोणत्याही धातूचा अंश उरत नाही.

सह्याद्रि सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना येथील कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ. अभिजीत पळशीकर यांनी या प्रक्रियेचे तपशील व फायदे उलगडून सांगितले. “या प्रक्रियेचे प्रमुख फायदे म्हणजे यात धातूचे कायमस्वरूपी इम्प्लान्ट वापरले जात नाही. स्टेन्ट शरीरात कायमचे राहते व त्यातून रिस्टेनोसिस (आर्टरी पुन्हा अरुंद होणे)चा धोका उद्भवू शकतो. लेझरच्या सहाय्याने ही प्रक्रिया करण्याची पद्धत वापरल्याने ही चिंता दूर होते. त्याशिवाय यामुळे रुग्णाची तब्येत लवकर सुधारते. या रुग्णालय तर एका दिवसात घरी परतता आले, स्वतंत्रपणे चालता आले आणि लगेचच आपली दैनंदिन कामे पूर्वीप्रमाणे सुरू करता आली. दुसऱ्या दिवसापर्यंत ते हिंडू-फिरू लागले, त्यांना आपणहून रेस्टरूमपर्यंत जाता आले त्यामुळे दुपारपर्यंत त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला.

हि प्रक्रिया मिनिमली इन्व्हेजिव्ह स्वरूपाच्या पारंपरिक स्टेन्टिंग पद्धतींना एक अधिक सुरक्षित आणि रिणामकारक पर्याय म्हणून अतिशय चांगली आहे. पुण्यात पार पडलेली अशा प्रकारची पहिलीच प्रक्रिया यशस्वी झाल्याने इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीच्या क्षेत्रातील एक नवे पर्व सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे.” असे सह्याद्रि ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आणि मेडिकल डिरेक्टर डॉ. सुनील राव यावेळी म्हणाले.

या प्रक्रियेत वापरले गेलेले एक्सिमर लेझर हे तंत्रज्ञान कॅल्शियमयुक्त प्लाकचे अचूकतेने उच्छेदन करते. तसेच  हा प्लाक प्रभावीपणे काढून टाकताना रुग्णास असणाऱ्या धोक्याचा प्रभाव देखील कमी करते. या तंत्रज्ञानाच्या जोडीला वापरले जाणारे ड्रग-कोटेड बलून्स निश्चित ठिकाणाला लक्ष्य करणारी उपचारपद्धती पुरवितात. यामुळे कायमस्वरूपी इम्प्लान्ट बसविण्याची गरज भासत नाही व रिस्टेनोसिसला रोखता येते. त्याशिवाय ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आहे, ज्यात लेझरवर अतिशय काटेकोरपणे नियंत्रण ठेवता येणे शक्य असते. तसेच ‘स्टेन्ट-ब्लॉकेज’ असलेल्या रुग्णांसाठीच सुद्धा ही प्रक्रिया एक उत्कृष्ट पर्याय आहे, कारण लेझर थेरपीमुळे आणखी एक स्टेन्ट बसविल्याशिवाय देखील अडथळा दूर करता येणे शक्य होते.

असे अनेक फायदे असल्याने लेझर-असिस्टेड, स्टेन्ट विरहित अँजिओप्लास्टी भविष्यात एक सर्रास केली जाणारी प्रक्रिया बनेल व अनेक रुग्णांच्या बाबतीत पारंपरिक अँजिओप्लास्टीची जागा घेऊ शकेल अशी अपेक्षा आहे. ही प्रक्रिया केवळ कोरोनरी आर्टरी डिसीजेससाठीच नव्हे तर जिथे स्टेन्स्ट फारसे परिणामकारक ठरत नाही अशा तुलनेने छोट्या रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजेसवर उपाय करण्यासाठीही एक उपयुक्त पर्याय ठरू शकते.

एक नवी वाट निर्माण करणारी ही प्रक्रिया अँजिओप्लास्टीच्या उपचारांची संकल्पनाच बदलून टाकणारी आहे. कायमस्वरूपी स्टेन्ट्स बसविण्याविषयी साशंक असणाऱ्या रुग्णांना किंवा गुंतागुंतीचे कॅल्शियमयुक्त ब्लॉकेजेस असलेल्या रुग्णांना आता अधिक चांगल्या परिणामांची व धोका कमी करण्याची हमी देणारा पर्याय यामुळे उपलब्ध झाला आहे. पुण्यातील पहिल्या लेझर-असिस्टेट, स्टेन्ट विरहित अँजिओप्लास्टीला मिळालेले यश कार्डिअॅक उपचारांच्या एका नव्या युगाच्या आरंभाचा संकेत आहे. भविष्यात या पद्धतीचा सर्वदूर स्वीकार होईल, अशी आपली अपेक्षा आहे.डॉ. पळशीकर पुढे म्हणाले.

सह्याद्रि हॉस्पिटल असाधारण कार्डिअॅक उपचारांसाठी व रुग्णांना सर्वोत्तम परिणाम मिळवून देण्याऱ्या  नवीनतम वैद्यकीय तंत्रज्ञानांना उपचारांत समाविष्ट करून घेण्यासाठी आणि त्यायोगे जपलेल्या रुग्ण बांधिलकीसाठी प्रख्यात आहे.

Leave a Comment