ही गीते आजही मनाला आनंद देतात – खा. सुनेत्रा पवार

Admin

सुनेत्रा पवार

पु. ल., गदिमा, वसंत प्रभू, राम कदम, जगदीश खेबूडकर यांची गाणी पुन्हा एकदा नव्याने ऐकताना त्यातील वेगळेपण नेहमीच जाणवते. ही गाणी ५० पेक्षा अधिक वर्ष जुनी असूनही, आजही ऐकताना मनाला आनंद होतो, असे मत खासदार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.

सॅब इव्हेंट्स व डि व्हर्ब थिएटर्स यांच्या वतीने ‘गीत तुझे स्मरताना शतजन्म शोधताना’ या कार्यक्रमाचे आयोजन केशरबाग येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सॅब इव्हेंट्सच्या डॉ. रेवती भामरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी धुंदी कळ्यांना, कौसल्येचा राम, शुक्रतारा मंदवारा, पदरावरती जरतारीचा, सप्तपदी ही रोज चालते यांसह विविध गीतांचे सादरीकरण करण्यात आले.

१९३२ साली मराठी चित्रपट संगीताची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि अवघ्या पन्नास वर्षात या सर्व कलाकारांनी मराठी चित्रपट संगीताला समृद्ध केलं. मराठी रसिकश्रोत्यांच्या मनामनांत घर केलेली आणि आपलीशी वाटणारी ही सर्वच मराठी गाणी अगदी सहजतेने प्रत्येक मराठी मनावर संस्कार करत गेली, याच गीतांचा ठेवा पुन्हा नव्याने रसिकांसमोर सादर करताना चांगले वाटले, असे या कार्यक्रमाचे दिग्दर्शक व संगीत संयोजक देवेंद्र भोमे म्हणाले.

या कार्यक्रमाचे दिग्दर्शन आणि संगीत संयोजनाची जबाबदारी देवेंद्र भोमे यांनी सांभाळली. निवेदन अभिनेत्री व कवयित्री स्पृहा जोशी व गौतमी देशपांडे यांनी केले. यामध्ये जयदीप वैद्य, शमिका भिडे, मुक्ता जोशी, आशुतोष मुंगळे, भूषण मराठे, निधी घाटे, इशिता सावळे, नम्रता लिमये, अर्णव जोशी, केदार चिखलकर, केतन पवार, नितीन शिंदे, धवल जोशी यांनी या गीतांना स्वरबद्ध केले.

Leave a Comment