प्रसिद्ध अभिनेते व शाहीर दादा पासलकर यांच्या शुभहस्ते मावशी नंबर १ चित्रपटाचा मुहूर्त उत्साहात
जयश्री फिल्म प्रोडक्शन कंपनीद्वारे मराठी चित्रपट मावशी नंबर १ या चित्रपटाचा मुहूर्त प्रसिद्ध अभिनेते व शाहीर दादा पासलकर यांच्या शुभहस्ते श्रमिक पत्रकार भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी नारायण सरदेसाई (अमेरिका) चित्रपटाचे निर्माते एम.एन.चव्हाण, लेखक – दिग्दर्शक – अशोक रत्नपारखी आणि चित्रपटातील कलाकार अभिनेते सुनिल गोडबोले, अरुण कदम, रोहित चव्हाण, शुभांगिनी देवकुळे, स्वाती कर्णेकर, राहुल मगदूम, अमोल नाईक संगीतकार अजय पराड तंत्रज्ञ आणि चित्रपट सृष्टीतील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना पासलकर म्हणाले की मराठी चित्रपट सृष्टी मध्ये सध्या नाविन्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती होत आहे . रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन व प्रबोधन करण्यासाठी यावर्षी मावशी नंबर १ हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त माझ्या हस्ते पार पडला याचा मला विशेष आनंद आहे. त्याचबरोबर हा चित्रपट महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवेल आणि भरपूर मनोरंजन करेल.
निर्माते एम.एन.चव्हाण म्हणाले की मावशी नंबर १ हा चित्रपट वेगळ्या धाटणीचा असून या चित्रपटात मराठी आणि हिंदी भाषेतील दिग्गज कलाकारांचे फळी रसिकांना पाहायला मिळेल. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला असून लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण निसर्गरम्य ठिकाणी करण्यात येणार आहे व याच वर्षी हा चित्रपट रसिकांना आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहता येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक – दिग्दर्शक अशोक रत्नपारखी यांनी केले तर आभार निर्माते एम.एन.चव्हाण यांनी मानले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा टापरे यांनी केले.