JSW डिफेन्स 800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह मानवरहित हवाई प्रणालीच्या उत्पादनासाठी सुविधा उभारणार आहे
तेलंगणा सरकारने JSW डिफेन्सची पूर्ण मालकीची उपकंपनी JSW UAV लिमिटेडसोबत राज्यात मानवरहित हवाई प्रणाली (UAS) तयार करण्यासाठी अत्याधुनिक उत्पादन सुविधा स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) केला आहे.
या धोरणात्मक उपक्रमाचा एक भाग म्हणून, JSW UAV सुमारे 800 कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात करणार आहे. अमेरिकेतील अग्रगण्य संरक्षण तंत्रज्ञान कंपनीसोबत तंत्रज्ञान कराराद्वारे ही गुंतवणूक केली जाईल.
दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक फोरम (WEF) च्या पार्श्वभूमीवर सामंजस्य करारावर तेलंगणाचे माननीय मुख्यमंत्री श्री. रेवंत रेड्डी आणि JSW ग्रुपचे पार्थ जिंदाल तसेच राज्यातील वरिष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.
या प्रसंगी तेलंगणाचे माननीय मुख्यमंत्री श्री रेवंत रेड्डी म्हणाले, “हैदराबाद आणि तेलंगणा यांनी जागतिक बाजारात सॉफ्टवेअर आणि औषधनिर्मिती क्षेत्रातील अग्रणी म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. स्पष्ट दृष्टिकोन आणि परिश्रमांच्या आधारे आता तेलंगणा सेमीकंडक्टर, संरक्षण, खाजगी अवकाश ते FMCG यांसारख्या विविध क्षेत्रांमधील उत्पादनांमध्ये, गुंतवणुकीसाठी एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे. चीन प्लस वन धोरण राबवून जगभरात सर्वांसाठी तेलंगण हा प्रभावी, प्राधान्याने विचारात घेण्याचा पर्याय म्हणून स्थान निर्माण करण्याच्या माझ्या सरकारच्या प्रयत्नांना आता यश मिळत आहे.”
JSW ग्रुपचे पार्थ जिंदाल म्हणाले, “हा सामंजस्य करार भारतातील संरक्षण तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्याच्या आमच्या दृढ बांधिलकीचे प्रतीक आहे. तेलंगणाचे माननीय मुख्यमंत्री श्री. रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे मार्गदर्शन आणि उद्योगस्नेही धोरणांमुळे असे उपक्रम शक्य होत आहेत. याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत.”
JSW डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड ही 24 अब्ज अमेरिकन डॉलर किमतीच्या JSW समूहाचा भाग असून Shield AI, Inc या अमेरिकेतील अग्रगण्य संरक्षण तंत्रज्ञान कंपनीसोबत त्यांची धोरणात्मक भागीदारी आहे. या भागीदारीच्या माध्यमातून Shield AI चे “V-BAT”, ग्रुप 3 मानवरहित हवाई प्रणाली (UAS) चे भारतात स्वदेशीकरण व उत्पादन केले जाईल. ही भागीदारी जागतिक दर्जाचे UAS तंत्रज्ञान भारतात आणून देशाच्या संरक्षण क्षमतांना चालना देण्यासाठीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.