फ्रेंड्स ऑफ ट्रायबल सोसायटी, एम.आय. जी संस्था आणि कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने एकल रन हाफ मॅरेथॉनचे आयोजन बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून धावपटू तसेच सामान्य नागरिकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये लहान मुले, तरुणाई, प्रौढ तसेच वयोवृद्ध यांची विशेष उपस्थिती होती.
स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल, राज्यमंत्री शेखर मुंदडा, एकलचे अध्यक्ष वसंत राठी, एम. आय जीचे. अध्यक्ष जितेंद्र लखोटिया, फ्रेंड्स ऑफ ट्रायबल सोसायटी मुंबईचे खजिनदार घनशाम मुंदडा यांच्या हस्ते फ्लॅग देवून करण्यात आले. या स्पर्धेत ३, ५, १० व २१ किमी असे गट करण्यात आले होते.
गोयल म्हणाले की उत्तम आरोग्यासाठी रोज सकाळी स्वतःसाठी धावले पाहिजे. अशा स्पर्धेनिमित्त सर्वांना एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण होते. एकमेकांच्या शारीरिक तंदुरुस्तीची आपल्याला माहिती मिळते. एखादी बाब जर समूहाने केली तर ती अधिक परिणामकारक ठरते. ते पुढे म्हणाले की या मॅरेथॉनचे आयोजन करण्यामागे हा उद्देश होता की युवकांना जोडणे, जनजागृती करणे आणि ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण आणि उन्नती करण्याच्या आमच्या उद्देश होता. रोज नियमितपणे धावावे कारण धावणे हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.
शेखर मुंदडा म्हणाले की एकल रनच्या माध्यमातून देशभरातील दुर्गम खेड्यातील शेकडो शाळेत शिक्षण घेणारे गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम स्तुत्य आहे. एम आय जी संस्थेचे मला कौतुक करावे तितके कमीच आहे. मानवी जीवनातील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे आरोग्य. ते व्यवस्थित असेल तरच आपण आपल्या जीवनाचा योग्य तऱ्हेने उपभोग घेऊ शकतो. यासाठी व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. धावणे असा एकमेव व्यायाम आहे, ज्यात संपूर्ण शरीराची एकाच वेळेस क्रिया होते.
वसंत राठी आणि जितेंद्र लखोटिया म्हणाले की या स्पर्धेत ३ हजार स्पर्धकांना सहभाग घेतला होता. यात विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, मेडल देवून गौरविण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांना मेडल, प्रमाणपत्र आणि उत्तम आहार देण्यात आला. ते पुढे म्हणाले एकल अभियान ही एक लोकचळवळ आहे. दुर्गम खेड्यातील मुलांना मूलभूत प्राथमिक शिक्षण ‘एकल विद्यालया’च्या स्वरूपात दिले जाते.
मनोज बेहेडे, कोहिनूर इंदानी, विक्रम धुत, दिनेश मुंदडा, रवी काबरा, संजय भुतडा, रोहित आरोटे, सागर राठी, नितेश मणियार यांनी स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेतले.