महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, भाजप महायुतीचे उमेदवार सुनिल कांबळे यांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुण्यात डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधला. या विशेष मेळाव्यात त्यांनी महायुती सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकत, सामान्य जनतेच्या प्रश्नांवर उपाययोजना मांडल्या.
डॉ. प्रमोद सावंत यांनी आयुष्मान भारत योजना आणि महाराष्ट्रातील महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “डबल इंजिन सरकारच्या नेतृत्वाखाली देशातील आणि राज्यातील आरोग्य सेवा मजबूत करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात वार्षिक ५ लाखांपर्यंतची आरोग्य सुरक्षा मिळवून दिली असून, ७० वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला याचा लाभ मिळतोय.”
या मेळाव्यात पुण्यातील मेट्रो प्रकल्पांवरही चर्चा झाली. डॉ. सावंत यांनी सांगितले की, पुणे मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी, चिंचवड ते स्वारगेट या मार्गांचे काम पूर्ण झाले असून, शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गही पूर्णत्वाकडे आहे. भूमिगत मेट्रो प्रकल्पांमुळे पुण्याच्या नागरी व्यवस्थेत मोठा बदल होत आहे.
कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांनी सुनिल कांबळे यांच्या कामाचे कौतुक केले. “सामान्य माणसाच्या प्रश्नांवर काम करणारे नेते म्हणून कांबळे यांची ओळख आहे. त्यांच्या विजयानंतर आरोग्य क्षेत्रात नवा अध्याय सुरू होईल,” अशी प्रतिक्रिया डॉक्टरांकडून व्यक्त झाली.
भाजप महायुती सरकारच्या प्रगतीशील धोरणांना पाठिंबा देत, महायुतीचा विजय सुनिश्चित करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. “भाजप महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे,” हे विधान उपस्थितांमध्ये उर्जा निर्माण करणारे ठरले.
सुनिल कांबळे यांच्या प्रचार मोहिमेला मिळत असलेल्या या सकारात्मक प्रतिसादामुळे आगामी निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असल्याचे चित्र आहे.