महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात अनेक मोठी कामे केली जात आहेत. ज्यामुळे महाराष्ट्राची 1 ट्रीलियन डॉलर ची अर्थव्यवस्था बनवेल. तर 5 मिलियन डॉलर सह महाराष्ट्र भारत देशाला जगातील तिसरी महत्त्वाची अर्थव्यवस्था बनायला मदत करेल, असा विश्वास आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी व्यक्त केला. तसेच महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने वाटचाल करताना पहायचे असेल तर महाराष्ट्रात स्थिर सरकार गरजेचे असल्याचे सांगत महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन जनसेना पक्षाचे नेते आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी केले.
भाजपा महायुतीचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुनिल कांबळे यांच्या प्रचारार्थ घोरपडी येथे पवन कल्याण यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी, माजी मंत्री दिलीप कांबळे, उमेदवार आमदार सुनिल कांबळे, आमदार चेतन तुपे, आमदार योगेश टिळेकर, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आरपीआय (आ) शहराध्यक्ष संजय सोनवणे, शिवसेनेचे किरण साळी, माजी नगरसेवक उमेश गायकवाड, मंगला मंत्री यांच्यासह महायुती मधील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सनातन धर्माचं स्वप्न साकार करा, असे आवाहन करून पवन कल्याण म्हणाले, मागील दहा वर्षात एनडीए सरकारने देशाला विकासाच्या मार्गावर नेले आहे. याशिवाय काश्मिर मधील कलम 370 हाटवले, आयोध्येत श्री रामांचे आगमन झाले आहे. जागतिक पातळीवर आधी नव्हे ते आपल्या देशाचे राजकीय, सामाजिक अस्तित्व बळकट झाले आहे. यातून देश महासत्तेकडे वाटचाल करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सुनील कांबळे म्हणाले, घोरपडी भागात गेली 40 वर्ष रेल्वे फाटक लागल्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. ती समस्या आपण येथील नगरसेवकांसह चर्चा करून सोडवली. येथील पाण्याचा प्रश्न निकाली काढला. कोरोनाच्या काळात आपल्या कार्यकर्त्यांनी 18 – 18 तास काम केले आहे. त्यामुळे पुढील काळात ही विकासाच्या बाजूने येथील नागरिक मतदान करतील, असा मला विश्वास आहे.
सी. टी. रवी म्हणाले, हजारो लोकांनी बलिदान देऊन सनातन धर्म आणि राष्ट्राची रक्षा केली. आज आपली संस्कृती टिकून आहे, ती केवळ आपल्या पूर्वजांच्या बलिदानामुळे. मात्र स्वतंत्र भारतात राष्ट्र, धर्म, संस्कृती टिकवण्यासाठी बलिदान देण्याची गरज नाही; फक्त मतदान करा. तुमची सुरक्षा आता तुमच्या हातात आहे. तुमचं एक मत तुमचं भविष्य घडवणार आहे.