मलाबार समूहाकडून रस्त्यावरील मुलांच्या शाळेतील प्रवेशासाठी २४७ सूक्ष्म शिकवण केंद्रांचे कार्यान्वयन

Admin

Malabar मलाबार

मलाबार समूहाच्या सध्या सुरू असलेल्या हंगर फ्री वर्ल्ड उपक्रमाचा एक भाग म्हणून, रस्त्यावरील मुलांना मूलभूत शिक्षण देण्यासाठी आणि औपचारिक शालेय शिक्षणात त्यांचे संक्रमण सुलभ करण्यासाठी देशभरात २४७ सूक्ष्म शिकवण केंद्रे (मायक्रो लर्निंग सेंटर्स -एमएलसी) सुरू करण्यात आली आहेत.

आतापर्यंत, या केंद्रांमध्ये ११,७०० मुलांची नोंदणी करण्यात आली आहे, जिथे त्यांना एक वर्षाचे मूलभूत शिक्षण मिळते. जेणेकरुन त्यांना औपचारिक शिक्षणात परत येण्यास किंवा शाळेत प्रवेश घेण्यास मदत मिळते. या उपक्रमावर प्रत्येक मुलामागे साधारण १०,००० रुपये वार्षिक खर्च समूहाकडून केला जात आहे.

मुंबईच्या पूर्व उपनगरांत, गोवंडी येथील टाटा नगर झोपडपट्टीत आयोजित एका समारंभात, मलाबार समूहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद यांनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा भाग म्हणून ११ राज्यांमध्ये १०१ सूक्ष्म शिकवण केंद्रांचे (एमएलसी) उद्घाटन केले. या कार्यक्रमातील मान्यवरांमध्ये मलाबार समूहाचे उपाध्यक्ष केपी अब्दुल सलाम, भारतातील कारभाराचे व्यवस्थापकीय संचालक ओ. आशर, समूह कार्यकारी संचालक ए.के. निषाद आणि स्वयंसेवी संस्था – ‘थनाल’चे अध्यक्ष डॉ. व्ही. इद्रीस यांचा समावेश होता.

या उपक्रमावर भाष्य करताना, मलाबार समूहाचे अध्यक्ष, एम. पी. अहमद म्हणाले, “हा प्रकल्प रस्त्यावरील मुलांना शिक्षणाद्वारे गरिबीच्या चक्रातून मुक्त होण्याची संधी देऊन त्यांचे शाश्वत भविष्य घडवण्याची आमची बांधिलकी प्रतिबिंबित करतो. आम्हाला विश्वास आहे की या सूक्ष्म शिकवण केंद्रांच्या माध्यमातून, आम्ही हजारो मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम पाया रचत आहोत, ज्याची सुरुवात मूलभूत शिक्षणाच्या उपलब्धतेतून केली जात आहे.”

मलाबार समूहाने पुढील दोन महिन्यांत १६ राज्यांमध्ये अतिरिक्त २५० सूक्ष्म शिकवण केंद्रे स्थापन करण्याची योजना जाहीर केली आहे. एकदा ही केंद्रे कार्यान्वित झाल्यानंतर, प्रत्येक वर्षाला २५,००० मुलांना सेवा देऊ शकतील. १०वी इयत्ता पूर्ण करणाऱ्या मुलांना विविध राज्यांतील कॅम्पसमध्ये उच्च शिक्षणासाठी समर्थन मिळेल, महिला सक्षमीकरणासाठी समूहाच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून मुलींना अतिरिक्त शिष्यवृत्ती उपलब्ध केली जाईल.

पुढील शालेय शिक्षणातील प्रवेशाला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करून अत्यावश्यक शिक्षण देणे हे सूक्ष्म शिकवण केंद्रांचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक या प्रमाणात स्थानिक समुदायातूनच शिक्षकांची नियुक्ती केली जाते आणि मुलांना त्यांच्या अभ्यास कालावधीत दूध, केळी आणि अंडी यासह पौष्टिक आहार दिला जातो. केंद्रात त्यांनी एक वर्ष पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना औपचारिक शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी देखील मदत केली जाते.

हंगर फ्री वर्ल्ड प्रकल्प रस्ते व पदपथावरील रहिवाशांच्या इतर गंभीर गरजा देखील पूर्ण करतो, ज्यात आरोग्यसेवा, मातांचे पुनर्वसन, शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छतागृह व तत्सम सुविधांचे बांधकाम आणि सरकारी लाभ सुरक्षित करण्यासाठी कागदपत्रांची खात्री करणे यांचा समावेश आहे. ‘थनाल’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविला जात आहे.

मलाबार समूह १६ भारतीय राज्यांमधील ८० शहरांमध्ये दररोज ५०,००० पौष्टिक अन्न पाकिटांचे वितरण करत आहे आणि झांबियातील शाळकरी मुलांना दररोज १०,००० अन्न पाकिटे पुरवतो. जागतिक स्तरावर २०० केंद्रांवर दररोज एक लाख लोकांपर्यंत पोहोचून या उपक्रमाचा विस्तार करण्याचे समूहाचे उद्दिष्ट आहे.

या व्यतिरिक्त, मलाबार समूहाचा ‘ग्रँडमा होम’ उपक्रम निराधार महिलांसाठी निवारा प्रदान करतो, बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये सर्वसमावेशक सुविधांसह त्यांना मोफत निवास प्रदान करतो. या उपक्रमांच्या विस्ताराच्या नियोजनामध्ये केरळ, चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि मुंबई येथे नवीन ‘ग्रँडमा होम’ घरांचा समावेश आहे. नुकतेच समूहाने संपूर्ण भारतातील महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या चालू असलेल्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून २१,००० मुलींसाठी १६ कोटी रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान केली आहे.

स्थापनेपासून मलाबार समूहाने शिक्षण, आरोग्यसेवा आणि समाजकल्याण यांवर केंद्रित असलेल्या सामाजिक दायीत्व अर्थात सीएसआर प्रकल्पांवर २६३ कोटी रुपये खर्च केले आहेत. हंगर फ्री वर्ल्ड प्रकल्पात भागीदारी करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्ती आणि संस्था अधिक माहितीसाठी मलाबार चॅरिटेबल ट्रस्ट किंवा थनाल नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनशी संपर्क (दूरध्वनी क्रमांक : ०४९५ -२७२६९१९) साधू शकतात.

Leave a Comment